Introduction

असा मी

स्वत:विषयी सांगायचे म्हणजे मला वाटतं हे सगळ्यात अवघड काम असावं! कारण आपण काहीही सांगितल तरी ते कित्येकांना खोट वाटतं! मग सांगुन काय फायदा?
तरी देखील आता तुम्ही इथपर्यंत आला आहात तर तुम्हाला माझ्याविषयी काहीतरी समजल पाहिजे अस मला तरी वाटतय.


मी संतोष, आयटी क्षेत्रात काम करतो ("मग त्यात काय नवल!" आले बर का तुमचे शब्द ऐकायला मला!) तसा मी जुन्नर तालुक्यातील येडगावचा पण राहतो मात्र डोंबिवलीत! गावाचं नाव जरी ’येडगाव’ असलं तरी तस हे शहाण्यांचे गाव (शहाणे ह्या शब्दात ’अती’ सायलेंट आहे!)! हे एक धरणग्रस्त गाव, त्यामुळे गावाचा परिसर वर्षाचे बाराही महिने हिरवागार असतो! गाव चारही बाजुंनी ऐतिहासिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक नि वैज्ञानिक स्थळांनी वेढले आहे! एका बाजुला शिवनेरी, दुसऱ्या बाजुला ओझरचा श्री विघ्नेश्वर, तिसऱ्या अंगाला विदेशी मद्याचा कारखाना म्हणजे वायनरी, त्याच्याच बाजुला खोडद येथील जगप्रसिद्ध रेडियो दुर्बिण नि चौथीकडे तमाशा पंढरी नारायणगाव!


स्वभावत: मी एकदम शांत आहे. (आई, प्लिज तु नको हे वाचुस!) म्हणजे तसा मी शांतच आहे पण घरातले सगळ्यांच्या मतानुसार मी फार म्हणजे फारच तापट आहे! त्यांना वाटत कि कुठल्याही फालतु कारणावरुन भडकतो! सुट्टिच्या दिवशी कोणतही काम करायचा अतिप्रचंड कंटाळा! नि ह्यावरुनच घरात बायकोच नि माझं दर रविवारी भांडण हे ठरलेलं!


माझे छंद म्हणजे (अर्थातच) ट्रेकिंग, वाचन आणि आई बघत असणाऱ्या झी मराठीवरल्या मालिकांना नाव ठेवणं! नुकताच फोटोग्राफिचा किडापण चावलाय! ह्याला कारण म्हणजे हेच आपले इतर ब्लॉगर्स. काय एकेकजण सुंदर छायाचित्रे टाकतात, राव!


तर हा असा मी!