Introduction

लोकलचा ’फर्स्ट क्लास’

लहानपणी मोठेबाबांकडे जाण्यासाठी जेव्हा जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा तेव्हा ’फर्स्ट क्लास’चा रिकामा डब्बा पाहुन त्या डब्ब्यात प्रवास करावा असं वाटत राहयचे! पण त्याकाळच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं! पण जसा नोकरीला लागलो नि पगार वाढत गेला तेव्हा प्रथम दर्जाचा मासिक पास काढावासा वाटला नि हा विचार लगेच अंमलात आणला. लोकलच्या ’द्वितीय दर्जा’ ते ’पहला दर्जा’ ह्या प्रवासात जाणवल की येथे फक्त डब्ब्यांच्या ’सिट्स’ मध्येच नाही तर प्रवाशांच्या ’थॉट्स’ मध्ये सुद्धा बराच फरक आहे.

द्वितीय दर्जा हा सर्वसमावेशक असल्यामुळे येथे अठरापगड लोक दिसुन येतात. कुणीही कोणत्याही अवतारात आला तरी त्याला डब्ब्यात जागा असते. मग त्याच्याकडे तिकीट असो किंवा नसो! पहिल्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र अवतार हा नेहमी ’अप टु डेट’च असावा लागतो!  नाहीतर लगेच, ’बॉस, फर्स्ट क्लास है!" चा ओरडा चालु होतो. मलासुद्धा एकदा ह्या दर्जाची हवा लागली. मी एका पोरगेलासा दिसणाऱ्या व्यक्तीला त्याचा अवतार पाहुन असंच म्हटलं ’बॉस, पुढच्या स्टेशनला ऊतरुन घे, टी.सी. आलातर ऊगाच २००-३०० जातील फुकटचे!’ तेव्हा त्याने मला जे उत्तर दिले त्याने मी ठरवलं इथुनपुढे कधीही कुणालाही ’फर्स्ट क्लास है’ हे सांगायचं नाही. तो मला म्हणाला, ’मला माहिती आहे, हा आमचा युनिफॉर्म आहे नि मी एका कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोच आहे!"

हिच गत पहिल्या दर्जात दिसणाऱ्या वर्तमानपत्रांध्ये दिसुन येते. मला कधी कधी संशय येतो की रेल्वेने फर्स्ट क्लासचा पास देण्यासाठी ’एकॉनॉमिक्स टाईम्स’ कंपलसरी केलाय की काय? ज्याच्या त्याच्या कडे बघावं तर हे वर्तमानपत्र. प्रत्येकजण जणु काही मोठा शेअर ब्रोकरच! हा नसला तर डि.एन.ए नाहीतर ’टाईम्स’ आहेच! तसंच हातातल्या पुस्तकांचं. इथेही इंग्रजीच पुस्तक असतं आणि तेही ’नेहेमीच्याच यशस्वी कलाकारांचंच’. हे नेहेमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे सिडने शेल्डॉन, जॉन ग्रिशम आणि पाऊलो कोहेलो! ह्याव्यतिरिक्त मला कधी कुणी क्वचितच दिसला असेल! मराठी वर्तमानपत्र कदाचित दिसेन ह्यांच्या हातात, पण बाकीचे मराठी लेखक तर सोडाच पण एव्हरग्रीन पुलंचही पुस्तक कधी दिसणार नाही!

इथली लोकं चुकुनही दुसऱ्याला बसायला जागा देणार नाहीत. मुंबई ते डोंबिवली, एकदा बसले म्हणजे बसले! ऊठायचे ते फक्त ऊतरायचे स्थानक येण्याचा काही सेकंद अगोदर! दुसऱ्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र गाडीने विक्रोळी सोडले की कल्याणपासुन उभी असणारी लोकंच हक्काने सांगतात ’चलो भाई, पंप बंद करेके बैठनेको जगह दे दो!’ आणि तिनच्या सिटवर चौथा हक्काने ’थोडा खिसके बैठो’ म्हणुन जागा मागतो. ह्यात बसलेल्या तिघांनापण काही वावगे वाटत नाही. तेसुद्धा शांतपणे सरकुन जागा देतात. पहिल्या दर्जात मात्र तिनच्या सिटवर फक्त तिघेच बसतील! भले ते कितीही बारीक का असेनात!

पहिल्या दर्जातले लोक तसे पक्के शामळु! साधा बंद पंखा चालु करायला ही लोक सांगत नाहीत! बहुतेक असं कुणाला काही काम सांगणं ह्यांच्या ’स्टेटस’ मध्ये बसत नसावं! इतरवेळी कायद्याप्रमाणे वागणारी ही माणसे फक्त एकाबाबतीत थोडा धीटपणा दाखवतात. ’कृपया सीटवर पाय ठेवु नये.’ ह्या सुचनेचे उल्लंघन करताना! एवढी शिकलेली माणसे, पण ही साधी सुचना का पाळत नाही हे मला कधीच समजलेले नाही. ह्या सुचनेतुन ह्या लोकांनी एक मस्त पळवाट शोधुन काढलेली आहे. ती म्हणजे चपला किंवा बुट काढुन सीट्सवर पाय ठेवण्याची! पण अरे मुर्खांनो सुचना पाय न ठेवण्याची आहे, पादत्राणे न ठेवण्याची नाही!

माझं ह्या दर्ज्याच्या लोकांबाबतीत आणखी एक निरिक्षण अस आहे की, बहुतेक सर्व दक्षिण भारतीय ह्याच डब्ब्यातुन प्रवास करताना दिसतात! ह्यांचे सगळ्यात मोठे लक्षण म्हणजे ह्यातील बहुतेकजण हा सर्व डब्बा आपलाच आहे ह्या विचारात असतात! इतरांना ते अक्षरशः कःपदार्थ समजतात! एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो. सकाळच्या डोंबिवली लोकलला ह्या पहिल्या वर्गाच्या डब्ब्यात एक मोठा दक्षिण भारतीय ग्रुप चढतो आणि दरवाज्याच्या मधल्या मोकळ्या जागेत जागा अडवुन उभा असतो. एकदा २-३ रेल्वेचे लाईनमन ह्या डब्ब्यात चढले. त्यांचे कपड्यांचा मुळचा लाल रंग जाऊन तो काहीतरी भलताच झाला होता. ह्या ग्रुपमधला एकजण बोललाच ’ये फर्स्ट क्लास है!’ ग्रुपमधला दुसऱ्याने पहिल्याला अडवुन म्हटले ’रेल्वेवाले है, उनके बाप का गाडी है!’ ह्यावर एक लाईनमनने त्यांना सुनावले ’निचे उतरके गाडी आगे नही जाने दुंगा ना तो भी कोई हमे कुछ नही कहेगा! तम्मीजसे बात करो!’

ह्या लोकांचा हा अनुभव तर गुजराती लोकांची आणखी वेगळीच तऱ्हा! ही जमात दुसऱ्यांना मदत करायला नेहमीच पुढे. गर्दीत अनोळ्खी लोकांना पाणी दे नाहीतर उठुन जागा दे अशाप्रकारे ह्यांचं समाजकार्य चालु असतं! पण ह्यांचा तीन गोष्टीत फार राग येतो! एक म्हणजे ह्यांनी शेअर मार्केटवर चर्चा सुरु केली की, पत्ते खेळायला सुरुवात केली की नि गुटखा खाल्ला की! ही लोकं नेहेमी पन्नास जणांशी एकाचवेळेला बोलल्यासारखे ओरडुन का बोलत असतात कुणास ठाऊक? ह्या दोन जमाती सोडल्यातर पहिल्या वर्गात सहसा काहीही ’इंट्रेस्टिंग’ घडवुन आणत नाही!

तर असा हा पहिला वर्ग! ’व्हाईट कॉलर्ड’ आणि ’स्टीफ अपर लीप’ वाल्यांचा वर्ग! आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तो प्रत्येक वेळेला लक्षात ठेवत असतो. म्हणुन तर पास किंवा तिकीट काढताना देखील हा वर्ग रुबाबात रांगेतल्या १-१ २-२ तास ऊभ्या असणाऱ्या लोकांकडे तुच्छ नजरेने बघत सरळ पुढे जातो नि तिकीट पास काढुन रुबाबात निघुन जातो. रांगेतले बिचारे त्याच्यामागे शंख करतात ’फर्स्ट क्लास का क्या निकाला तो सालेने पुरा रेल्वेही खरीद लिया!’

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा