काल जेष्ठ कृष्ण सप्तमी. अवघ्या महाराष्ट्राची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा ह्यांच्या पालखीचे आळंदीहुन पंढरपुरसाठी प्रस्थान झाले. त्याअगोदर दोन दिवस जगतगुरु तुकोबाराय ह्यांची पालखी देहुहुन निघाली. दोन्ही पालख्या आणि इतर संतांच्या पालख्या ह्या साधारण १८-२० दिवसांचा प्रवास करुन आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ’आषाढी एकादशी’ साठी पंढरपुर येथे पोहचतील.
ह्यावर्षी पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी आळंदीत जाण्याचा योग आला. तसं आमचं घराणं माळकरी! आमचे मोठेबाबा हे दरवर्षी वारीला न चुकता जाणारे. आमचे पप्पा कधी पायी वारीला गेल्याचे मला आठवत नाही पण ते प्रत्येक आषाढीला पंढरपुरला जातात. म्हणजे वारी आम्हाला नविन नाही. पण मी मात्र पहिल्यांदाच वारीत सहभागी झालो होतो. मान्य आहे कि पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे काही वारी नव्हे पण वारीच्या ह्या सोहळ्यातसुद्धा सुमारे २-३ लाख लोक सहभागी झाले होते. आणि हा सोहळा खरोखर अनुभवण्यासारखा असतो.
वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या (कि देशाच्या? कारण कर्नाटकातुन आलेल्या काही गाड्या मी काल तिथे पाहिल्या!) कानाकोपऱ्यातुन वारकरी आले होते. ह्यात सर्व जातीधर्माचे लोक होते. कोणीही उच्च निच भेदभाव पाळत नव्हता. प्रत्येकजण एकमेकाला ’माऊली’ ह्याच नावाने संबोधत होता. एका म्हाताऱ्या आजीचा मला धक्का लागला तर ती चक्क मला ’माऊली’ म्हणुन मला पटापट चालायला सांगत होती. अक्षरश: माझ्या तीन वर्षाच्या मुलाला बघुन म्हणाली ’ह्या माऊलीला वारीला आणलत ते बरं केलंत!’ माझ्या आजीच्या वयाची ती बाई मला व माझ्या पोराला ’माऊली’ म्हणतेय हे बघुन खरोखर माझ्या डोळ्यांत पाणी आलं!
आपल्या घरादाराची चिंता काळजी मागे ठेऊन हे सर्वजण १५ दिवस एकच ध्यास घेऊन चालत असतात. त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास! खरतर हे पावसाळ्याचे दिवस म्हणजे त्यांचे कामाचे दिवस पण सर्व कामे आटोपुन किंवा आपल्या लेकासुंनांवर सोपवुन ही सर्व निघालेली असतात त्या ’विठ्याच्या’ दर्शनाला! आणि प्रस्थान सोहळ्यासाठी आलेला प्रत्येकजण पुढे वारीला जातो असे काही नाही! काहीजण हा प्रस्थान सोहळा आटोपुन परत आपल्या गावी परतात! काल ’भारत बंद’! सर्व सार्वजनिक वाहतुक जवळ जवळ बंदच होती! शिवाय कुठेही कधीही ’राडा’ होऊ शकेल ह्याची भिती होती. पण ती चिंता ते क्लेश जणु ’देशांतरा’ पाठवुन ही सगळी मंडळी काल आळंदीत जमा झाली होती! मी आळंदीतुन पुण्याला परत येण्यासाठी निघालो तेव्हा एकजण मला म्हणाला की मलापण बार्शीला जायाच्या गाड्या निघतात तिथवर सोडाल का? चौकशी करता कळली कि तो निव्वळ ह्या ’दिंडीला वाटंला लावायला’ बार्शी तालुक्यातला कुठल्याशा गावातुन आला होता. घरात एकवेळ खाण्याची भ्रांत असेल पण वारीला जाण्यासाठी ही लोकं कुणापुढे हात पसरायला मागे पुढे पाहत नाहीत! वर्षाच्या अकरा महिन्यांचे कष्ट कित्येकजण निव्वळ ह्या एका महिन्यासाठी सहन करीत असतात!
आणि एवढी गर्दी असुनही मला कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा गडबड दिसली नाही. जो तो एकदम शिस्तबद्ध वागताना दिसत होता. प्रत्येकजण इतका शिस्तीत होता की मनात विचार आला की वारीव्यतिरिक्त ह्यातले कितीजण एवढी शिस्त पाळत असतील? पण सांगायचा मुद्दा हा की खरोखरच काल कुठलाही प्रकारचा गोंधळ नव्हता. सगळ्या गाड्या व्यवस्थित पार्क केल्या होत्या! एकामागोमाग एक दिंड्या निघत होत्या पण त्या वाहतुकीला तसुभरही अडचण आणत नव्हत्या! मुळात कुणीही त्या गर्दीत उगाचच गाडी घालण्याचा प्रयत्न करीत नव्हता! जणु काही ’माऊली माऊली’ म्हणुन प्रत्येकाच्याच मनात एकप्रकारचा दुसऱ्याविषयी मायेचा ओलावा भरुन आला होता! वाहतुक पोलीस होते. पण त्यांना बिलकुल काम करण्याची गरजच नव्हती. एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आवर घालण हे खरतर अतिशय कठिण पण इथे मात्र ते सगळ्यात सोपं असल्यासारखं वाटत होतं! पोलिसांनीसुद्धा त्यांचा जगप्रसिद्ध पोलिसी खाक्या इंद्रायणीत सोडुन दिला होता. एकाही पोलिसाला कुणावरही एकदाही उगाचच डाफरताना पाहिल नाही! तेसुद्धा ’माऊली’ म्हणुनच सगळ्यांना वागवत होते!
आणि जशी ’माऊलीं’ची पालखी महादरवाज्याचा बाहेर पडली तसा सगळीकडे एकच नाद ऐकु येउ लागला ’पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’! सगळीकडुन टाळ नि मृदुंगाचे स्वर ऐकु येत होते. भजनांचे आवाज आसमंत भारुन टाकत होते! एका दिव्य यात्रेला प्रारंभ झाला होता! अवघ्या महाराष्ट्राचे सर्व प्रश्न आता मागे पडणार आहेत! ग्यानबा तुकाराम हेच आता विदर्भ, मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे असणार आहेत. आता पाउले चालणार आहेत ती पंढरीची वाट!
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल
द्वारा पोस्ट केलेले
Santosh
येथे
८:२४ AM
मंगळवार, जुलै ०६, २०१०
लेबल:
alandi,
dehu,
dindi,
dnyaneshwar,
pandharpur,
Pune,
tukaram,
vithoba
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी(ण्या):
Kharach kiti chan lihitos.
ani kiti barik nirkishan ahe re tuze. Vachan evade vast asalyamule tuza likianat tar ek lekhakch disayala lagala ahe mala. Mastch.
mala mahit hotach ki maza dadamadhe kahitari khas means x factor ahe te......
Ani devache darshan kase zale tuze????
टिप्पणी पोस्ट करा