Introduction

भटकंती

 पावसाला सुरुवात झाली की प्रत्येक (म्हणजे जवळजवळ प्रत्येक, कारण माझा एक मित्र आहे. तो म्हणजे पक्का घरकोंबडा! अगोदर ’मेडिकल रिझन्स’मुळे घर सोडत नव्हता आणि आता ’मॅरिटल रिझन्स’मुळे घर सोडत नाही! आणि माझ्या ह्या मित्रासारखे आणखी बरेच असतील. तर असो!) मुंबईकर (हो...हो पुणेकर देखील रे बाबांनो!) गुगलबाबांना नवस बोलतात कि ’बाबारे मला नि माझ्या ग्रुपला भटकायला योग्य ठिकाण सांग, मी पुढचं वर्षभर इतर कुठल्याही बाबाच्या आश्रमात हिंडणार ’बिंग’णार नाही! आणि गुगलबाबांना केलेला नवस नेहमीच फळतो!

तर बराच वेळ गुगला-गुगली केल्यानंतर आमच्या संघाचा (अरे यार ’ग्रुप’ला मराठीत काय बोलतात?) ह्यावेळेचा ट्रेक राजमाची ठरला आहे. आता तुम्ही म्हणाल जर ट्रेक ठरला आहे आणि हा अजुन जाऊनपण आलेला नाही तर मग ह्या टपालीचं (’पोस्ट’ला हा शब्द योग्य आहे का?) महत्त्व काय? तर मला तुमच्याकडुन माहिती हवी आहे!

सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही डोंबिवलीमधुन निघणार आहोत. आणि आम्हाला एक रात्र निवास करायचा आहे तर त्यासाठी आणखी काही ठिकाणं सुचवु शकलात तर फार बर होईल! म्हणजे आम्ही शुक्रवारी रात्री निघु शकतो. दुसरं म्हणजे जर तुम्ही मला येण्याजाण्याची माहिती सुद्धा द्यावीत! कृपया मला माथेरान, भिमाशंकर, पेब, हरिश्चंद्रगड किंवा नाणेघाट ही ठिकाणं सांगु नका. नाही म्हणजे ही ट्रेक्स खरोखर फार चांगली आहेत पण आमची ती झाली आहेत! तेव्हा आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे!

ही झाली जनरल मदत! आता एक आणखी एक फेवर! मला एक सर्वसाधारण (यस्स! आठवला ’जनरल’ला मराठी शब्द! आता फक्त तो ’फेवर’ राहीला!) उपयोगासाठी कॅमेरा घ्यायचाय! मी काही छायाचित्रण कलेत ’प्रो’ नाहीये! मी आपला एक साधासुधा ’हौशी’ छायाचित्रकार आहे. मी निकॉन कुलपिक्स पी९० किंवा पी१०० घेण्याचा विचार करतोय! माझे बजेट (माफ करा, पण मला खरोखर ह्या सगळ्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय आठवत नाहीये आता!) २५००० ते ३०००० आहे. तेव्हा तुम्ही मला एखादा कॅमेरा सुचवाल का? फंक्शन्स साधारण पी९० चेच असावेत!

मी तुमच्या प्रतिसादाची अगदी आतुरतेने वाट बघतोय!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा