Introduction

भटकंती

0 टिप्पणी(ण्या)
 पावसाला सुरुवात झाली की प्रत्येक (म्हणजे जवळजवळ प्रत्येक, कारण माझा एक मित्र आहे. तो म्हणजे पक्का घरकोंबडा! अगोदर ’मेडिकल रिझन्स’मुळे घर सोडत नव्हता आणि आता ’मॅरिटल रिझन्स’मुळे घर सोडत नाही! आणि माझ्या ह्या मित्रासारखे आणखी बरेच असतील. तर असो!) मुंबईकर (हो...हो पुणेकर देखील रे बाबांनो!) गुगलबाबांना नवस बोलतात कि ’बाबारे मला नि माझ्या ग्रुपला भटकायला योग्य ठिकाण सांग, मी पुढचं वर्षभर इतर कुठल्याही बाबाच्या आश्रमात हिंडणार ’बिंग’णार नाही! आणि गुगलबाबांना केलेला नवस नेहमीच फळतो!

तर बराच वेळ गुगला-गुगली केल्यानंतर आमच्या संघाचा (अरे यार ’ग्रुप’ला मराठीत काय बोलतात?) ह्यावेळेचा ट्रेक राजमाची ठरला आहे. आता तुम्ही म्हणाल जर ट्रेक ठरला आहे आणि हा अजुन जाऊनपण आलेला नाही तर मग ह्या टपालीचं (’पोस्ट’ला हा शब्द योग्य आहे का?) महत्त्व काय? तर मला तुमच्याकडुन माहिती हवी आहे!

सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही डोंबिवलीमधुन निघणार आहोत. आणि आम्हाला एक रात्र निवास करायचा आहे तर त्यासाठी आणखी काही ठिकाणं सुचवु शकलात तर फार बर होईल! म्हणजे आम्ही शुक्रवारी रात्री निघु शकतो. दुसरं म्हणजे जर तुम्ही मला येण्याजाण्याची माहिती सुद्धा द्यावीत! कृपया मला माथेरान, भिमाशंकर, पेब, हरिश्चंद्रगड किंवा नाणेघाट ही ठिकाणं सांगु नका. नाही म्हणजे ही ट्रेक्स खरोखर फार चांगली आहेत पण आमची ती झाली आहेत! तेव्हा आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे!

ही झाली जनरल मदत! आता एक आणखी एक फेवर! मला एक सर्वसाधारण (यस्स! आठवला ’जनरल’ला मराठी शब्द! आता फक्त तो ’फेवर’ राहीला!) उपयोगासाठी कॅमेरा घ्यायचाय! मी काही छायाचित्रण कलेत ’प्रो’ नाहीये! मी आपला एक साधासुधा ’हौशी’ छायाचित्रकार आहे. मी निकॉन कुलपिक्स पी९० किंवा पी१०० घेण्याचा विचार करतोय! माझे बजेट (माफ करा, पण मला खरोखर ह्या सगळ्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय आठवत नाहीये आता!) २५००० ते ३०००० आहे. तेव्हा तुम्ही मला एखादा कॅमेरा सुचवाल का? फंक्शन्स साधारण पी९० चेच असावेत!

मी तुमच्या प्रतिसादाची अगदी आतुरतेने वाट बघतोय!

घरची लक्ष्मी

4 टिप्पणी(ण्या)
दोन दिवस घरी एकटाच होतो. गुरुवारी मामेबहिणीचं लग्न होतं. आई नि बायको दोघीही मंगळवारी संध्याकाळीच तिकडे गेल्या होत्या. जातानाच सांगुन गेल्या की सगळ आवरुन ठेवलं आहे. कुठे काय ठेवले आहे ह्याची एक उजळणीच सतत चालु ठेवली होती. दोघींचं म्हणनं एकचं "घर आहे तस ठेवा!"

हेच तर आम्हाला, म्हणजे मी, पप्पा नि भाऊ आम्हा तिघांना अवघड जाणार होतं! बुधवारी सकाळी ऊठल्यापासुन आमची बोंब सुरु झाली. एक वस्तु जागेवर सापडेल तर शपथ! मग चालु झाले आमचे फोन "अग! हे कुठेय?... अगं माझं आयडी कुठं ठेवलस?..." आणि हे फोन कराण्यात फक्त मीच पुढे होतो अस नाही तर पप्पा नि भाऊ दोघांनीपण "LOOP Mobile दान योजना" सुरु केली होती.

बुधवारीतर आम्हीपण लग्नाला गेलो, पण ह्या दोन दिवसात, आईच्या भाषेत सांगायच तर आम्ही घराचा ’उकिरडा’ केला होता! साल्या ह्या मुंग्याना पण लगेच समजत कि ह्या घरातली बाई कुठेतरी गेली आहे. त्या चारही कोपऱ्यांतुन सर्वत्र संचारास्तव निघतात. एकाच दिवसाचे कपडे बघितल्यावर तिघांनी पण ठरवुन टाकलं कि आता कमीत कमी ६ महिने तरी कपडे घ्यायचे नाहीत! जेवणाचे हाल जरा कमी झाले! कारण आता हॉटेल्स गल्लोगल्ली झाली आहेत ना!

गुरुवारी दोघी घरी आल्यावर घर जरा परत माणसांत आलं! लॅपटॉप लावण्यासाठी त्याचा अ‍ॅडाप्टर मला नेहमीच्याच जागी  मिळाला. दुसऱ्या दिवशी बनियान परत वॉशिंग मशिनवर होता नि माझं आय कार्ड बरोबर बॅगेतच होतं! मुंग्यांनी नि झुरळांनी माघार घेतली होती! आणि दोन दिवसांनंतर मी पुन्हा एकदा ताजं स्वच्छ पाणी पित होतो नि देवाला ही ’घरची लक्ष्मी’ बनवण्याची सुबुद्धी झाल्याबद्दल त्याचे आभार मानत होतो!









  सहजच एक सुचलं म्हणुन विचारतो, साफसफाइच्या ह्याच सारखेपणामुळे झाडुलापण ’लक्ष्मी’ म्हणत असतील का?

विधानपरिषदेचा घोडाबाजार

0 टिप्पणी(ण्या)
विधानपरिषदेचा घोडाबाजार, आपलं निवडणुक संपली पण त्याचं कवित्व काही संपायचं नाव घेत नाहिये. आजच्या सामनात राज ठाकरे ह्यांना ’धनाजीराव’ हे नाव देण्यात आले आहे. (शिवसेनाप्रमुख त्यांच्या विरोधकांना नावं बाकी मस्त ठेवतात. लखोबा काय नि नारोबा काय! साहेबांचे हे एक आपल्याला जाम आवडतं!). हां तर, सांगायचा मुद्दा हा की, मनसेने "पैशांच्या थैल्या" घेऊन कॉंग्रेसचे आमदार निवडुन दिले, असं सामनाच्या संपादकांचे म्हणणे आहे.

आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकींच्या वेळी प्रचंड आर्थिक ’देवाणघेवाण’ होते, हे एकप्रकारे आपण सगळ्यांनी मान्य केले आहे असा एकंदरीत सर्व माध्यमे, जनता ह्यांचा सुर दिसुन येतोय! हा लोकशाहीला अत्यंत घातक असा पायंडा पडत चालला आहे. माध्यमांना ह्या घोडे बाजारावरील ’न्युज’शी काहीही देणं घेणं नाही, त्यांना ’उध्दव-राज’ ह्या जंगी सामन्यात खरा इंटरेस्ट आहे. म्हणुन तर एकाही बातमीत किंवा लोकल गाड्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या, ’राज साहेब योग्य बोलले किंवा उध्दव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे ह्यांना मस्त शालजोडीतली दिली’ ह्या विषयांच्याच! एकाही चर्चेचा विषय ह्या निवडणुंकामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना विरोध हा दिसुन येत नाही! लोकांना खरचं ह्या विधान परिषदेच्या निवडणुकांत काही इंटरेस्ट असावा का? ह्याचं उत्तर नाही असच द्यावं लागेल!

ह्या विधान परिषदेची मुळातच काही गरज उरली आहे का? काही राज्यांत अशा प्रकारचे ’अपर’ सभागृह अस्तित्त्वातच नाही आहे! आणि तशीही ह्या सभागृहाची गरज ही फक्त काही ’गरजवंतांची’ सोय म्हणुनच उरलेली दिसुन येतेय! सरळ निवडणुकीत हरलो तरीही मंत्री बनायचय? काही काळजी नाही, पक्ष विधान परिषदेत देईलच निवडुन! पुतण्याची ’करियर’ बनवायची आहे? आहे, विधान परिषद आहे! काही गंभीर आरोपांमुळे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला? नो प्रॉब्लेम, आरोपांचा धुरळा खाली बसेस्तोवर विधान परिषदेच्या निवडणुका लागतच आहेत! हे सभागृह हे समाजातील कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक ह्यांना कायदेमंडळात स्थान मिळाव म्हणुन आहे! पण विधानपरिषदेत ह्या क्षणाला किती कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक आमदार आहेत? अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याइतके!

कुठेतरी वाचलं होतं, समाजाला त्याच्या लायकीचाच पालनकर्ता भेटत असतो. रामराज्यातील प्रजा चांगली होती म्हणुनच त्यांना ’रामा’सारखा राजा मिळाला! आज आपल्या सरकारतील बरेच मंत्री कुठ्ल्याना कुठल्या वादात अडकल्याचं दिसुन येते. आपल्या गृहराज्यमंत्री तर एकापेक्षा एक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे चित्र आहे! हे सगळं होते कारण आपला निवडणुकीच्या बाबतीतला प्रचंड अनुत्साह! आपण जर योग्य उमेदवारांची निवड केली तर हा घोडे बाजार काही अंशी तरी टाळता येऊ शकतो. त्यासाठी आपणचं प्रयत्न करायला हवेत.

न्याय?

0 टिप्पणी(ण्या)
आज २६ वर्षांनंतर भोपाळ गॅस दुर्घटनेत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज निकाल दिला. आठ दोषींना २-२ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड आणि युनियन कार्बाईड या कंपनीला ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. मात्र ह्या कंपनीचा त्यावेळेचा अमेरिकन अध्यक्ष वॉरेन अ‍ॅंडरसन हा अजुन फरारी आहे. त्यामुळे खरचं भोपाळवासीयांना न्याय मिळाला आहे का?

मुळातच न्याय द्यायला २६ वर्षे कशी लागु शकतात? सुमारे २५००० जणांचा जीव घेणाऱ्या ह्या घटनेचे सरकार, न्यायालये आणि समाज ह्यांना खरेच काही गांभिर्य आहे की नाही? आजही ह्या वायुगळतीचे दुष्परिणाम भोपाळ आणि आजुबाजुच्या परिसरात जाणवत आहेत. आज पाव शतकानंतरही तेथील नागरिकांना श्‍वसनाचा, डोळ्याचा व स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो आहे. ह्या सगळ्याला जबाबदार कोण?

ह्या कंपनीची मुळ कंपनी असणाऱ्या UCC (Union Carbide Corporation) ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन कंपनीच्या देखभालीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. तरीसुद्धा त्याची दखल घेण्यात आली नव्हती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धोकेदायक रसायने, वायु हाताळण्याबाबतचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. एवढेच नव्हे तर वायुगळती सुरु झाल्यावर त्यावर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी किंवा त्या वायुगळतीविरुद्ध काय उपाय करण्यात यावेत हे प्रशासनाला सांगायलादेखील कंपनीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता.

ह्यावरुनच ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची कायदा खिशात घालण्याची मनोवृत्ती दिसुन येते. न्यायसंस्थेने उपलब्ध कायद्यांच्या आधारे हा निकाल दिला. पण ह्या मिळणाऱ्या १३ लाख रुपयांनी वायुग्रस्तांना भरपाई कशाप्रकारे देण्यात यावी हे देखील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले असते म्हणजे बरे झाले असते! आतापर्यंतच्या सर्व केंद्र सरकारांनी किती वेळा अ‍ॅंडरसनच्या हस्तांतरणासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे? एकदाही नाही!!! हे लोकांचे सरकार, त्यांच्या लोकांच्याच बाबतीत एवढे उदासिन कसे राहु शकते? एकाही केंद्रिय किंवा राज्य मंत्र्याचे आजच्या न्यायदानावर कुठल्याही प्रकारचे भाष्य आलेले नाही! जो तो आपल्यामध्येच मग्न! सामान्य मरतोय ना, मग मरुदेना तिच्या आयला! आम्ही आमच्या सरकारचे १०० दिवस, १ वर्ष साजरे करण्यातच धन्यता मानणार! वरती ह्याच डाऊ कंपनीला योग्य भरपाई घेतल्याशिवाय आणखी प्ल्यॅंट्स बांधायला परवानग्या देणार!

ह्या दुर्घटनेत ’जस्टिस’ नुसताच ’डिले’ झालेला नाही तर तो ’डिनाईड’ झालेला आहे! भोपाळ वायुग्रस्तांची लढाई अजुन संपलेली नाही. ती वॉरेन अ‍ॅंडरसनला शिक्षा होईपर्यंत चालुच राहणार आहे. तोपर्यंत करुयाच आपण सगळे ह्या ’जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनेचा’ महोत्सव साजरा दरवर्षी!!!

ता.क.: हा वॉरेन अ‍ॅंडरसन म्हणे आपल्या देशातल्या एका फार मोठ्या राजकिय घराण्याच्या अतिशय जवळकीतला आहे!

माझी प्रेमप्रकरणे

0 टिप्पणी(ण्या)
प्रकरण १

मी सातवीत होतो. आमच्या वर्गात एक अतिशय सुंदर मुलगी होती. ती मला फार आवडायची.
बस्स...



प्रकरण २

दहावी...
सगळीकडुन सकाळ संध्याकाळ नुसतं अभ्यासाचं टेन्शन... सकाळी ह्या क्लासला जा, संध्याकाळी त्या क्लासला जा... आणि सकाळच्या ’ह्या’ क्लासचे सरच आम्हाला शाळेत गणित नि रसायनशास्त्र शिकवायला होते. त्यांनी बीजगणित-भुमिति मधले एकुणेक गणित क्लासमध्ये सोडवुन घेतलं होतं, त्यामुळे शाळेत आम्ही त्यांच्या क्लासचे जेवढे म्हणून विद्यार्थी होतो ते सर्व शाळेत एकदम सुममध्ये त्यांनी दिलेली गणितं सोडवुन वर्गात ’शायनिंग’ मारायचो.

असंच एक दिवस त्यांनी एक-दोन अवघड उदाहरणे घरुन सोडवुन आणायला सांगितली. मी नेहमीप्रमाणे ’शायनिंग’ मारली कि हि गणितं तर आम्ही कधीच सोडवली आहेत. झालं... वर्गातल्या एका लोकप्रिय-शिक्षकप्रिय मुलीने ते ऐकलं नि मला म्हणाली

"ए काशिद, तुझी वही मला दे ना!"
"अग, मी दिली असती पण आमचा परवा सकाळी क्लासमध्ये बीजचा पिरिएड आहे ग!’
"अरे, एवढच ना! मी तुझी वही उद्या वर्गात आल्या आल्या परत देईन, मग तर झालं ना!"
अगोदरच एका मुलीने वही मागितली म्हणून मी हवेत होतो आणि आता तिने एवढं प्रॉमिस केल्यावर मी कशाला नाही म्हणतोय!
"ए, पण नक्की दे ऊद्या."
असं म्हणुन मी तिला माझी वही दिली.
पण दुसर्‍या दिवशी तिला वर्गात न पाहून आमच्या, आमच्या कपाळात!
पहिला तास सुरु झाला. मॅडमनी हजेरी घेतली नि शिकवायला लागल्या... तेवढ्यात एक सुंदर मुलगी वर्गाच्या दरवाज्यात येऊन ऊभी राहिली.
"मॅडम, मी आत येऊ?"
"ये" इति मॅडम.
"हं, बोल!"
आता आमचं सर्वांचं लक्ष तिच्याकडे!
"मॅडम, मी आठवीतली ***, तुमच्या वर्गातल्या **ची मैत्रिण. मी तिच्या जवळच राहते. ती आजारी असल्याने आज येणार नाहीये!"
"एवढच सांगायचं होतं का?"
"नाही मॅडम, आणखी एक काम होतं, ही वही काशिदला द्यायची होती!"
आणि वर्गातल्या तमाम पोरांना चिरकायला एक कारण मिळालं!
"ए, हसायला काय झालं! गप बसा सगळ्यांनी"
मॅडम बोलल्या तशी पोरं गप झाली. मी ऊठलो नि वही घेऊन आपल्या जागेवर येऊन बसलो.
बस्स, पोरांना कारणच मिळालं, दुसर्‍या दिवसापासुन जो तो मला चिडवु लागला. माझं तर एकदम "Love at first sight" झालं होतं. मलातर ती जाम म्हणजे ज्यामच आवडली होती. म्हणून मी ते चिडवण एन्जॉय करत होतो. एके दिवशी माझ्या बेंचवर बदामच्या चित्रात मला माझे नि तिचे नाव लिहिलेले दिसले. मनातुन आनंदच्या उकळ्या फुटत होत्या तरी मी ऊगाचच रागवण्याचं नाटक करत होतो. माझ्याही वह्यांमध्ये पानापानावर तिचेच नाव दिसु लागले.

हळु हळु ही खबर माझ्या जवळच्या मित्रांना समजली. त्यांनी मला तिला प्रपोज करायचे सल्ले द्यायला सुरुवात केली. पण माझी हिंमत काही झाली नाही.

असेच अनेक दिवस गेले. ती वर्गात तिच्या मैत्रिणीला भेटायला आली कि माझा जीव वरखाली व्हायचा! नि मित्र मुद्दाम मला जोरात काहीही काम नसताना हाक मारायचे!
आणि एक दिवस

"अरे काशिद, तुझी *** आज मी आपल्या ** सरांच्या मुलाबरोबर बागेत गप्पा मारताना बघितली! एकमेकांना चिटकुन बसले होते यार!"

मनात विचार आला "आयला, त्याचा बाप सर आहे, नि आपल्याला शिकवतो. उगाच कशाला त्याच्याशी पंगा घ्या! एकतर आपलं दहावीच वर्ष. फुकट त्याचा बाप वर्षभर खुन्नस ठेवेल आपल्यावर!"

बस्स...


!! इतिश्री द्वितियोध्याय संपुर्णम !!

अनेक प्रजाती, एक ग्रह, एक भविष्य

0 टिप्पणी(ण्या)
काल ५ जुन, जागतिक पर्यावरण दिन.

दरवर्षी युनायटेड नेशन्स एक विषय घेऊन हा दिवस साजरा करित असते. ह्या वर्षीचा विषय होता, ’अनेक प्रजाती, एक ग्रह, एक भविष्य’... हे वर्ष ’युनायटेड नेशन्स’ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे. ह्या आपल्या ग्रहावर अंदाजे ५ ते १०० दशलक्ष वेगवेगळ्या प्रकारचे जीव नांदत आहेत. पण त्यापैकी मानवाला फक्त २ दशलक्ष जीवांची ओळख पटलेली आहे. म्हणजे अजुनही असे अनोळखी जीव ह्या पृथ्वीतलावर आहेत.
ह्या असंख्य जीवांमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे कि ज्याची लोकसंख्या अमर्याद वेगाने वाढत आहे. त्याच्या गरजा वाढत आहेत. त्याची भुक वाढत आहे. आणि ह्याचमुळे त्याने इतरांच्या हक्कांवर हल्ला केला आहे. त्यामुळे बरेच जीव ह्या जीवनाच्या शर्यतीतुन बाहेर पडत चालले आहेत. असे बरेच जीव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
सुमारे १२००० जीव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ह्यात फक्त मानवास ज्ञात असणाऱ्या जीवांचाच समावेश आहे. कित्येक जीवतर आपणांस त्यांची ओळख होण्याच्या अगोदरच नामशेष होत आहेत.

ह्याला कारण एकच... मानवाच्या अमर्याद वाढीचा अमर्याद वेग. मानवाने सरळ सरळ ह्या जीवांच्या हक्काच्या परिसर परिघात अतिक्रमण केले आहे. साधं उदाहरण म्हणजे ’दिवा’ गाव. हे गाव, म्हणजे आता ह्याला गाव का म्हणायाचं हा मोठा प्रश्न आहे एवढी ह्या गावाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. हां तर काय सांगत होतो तर ह्या दिवा गावात खाडीवर भराव टाकुन इमारती बांधल्या आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्वच्या सर्व इमारती अनधिकृत आहेत. ह्या गावात माझ्या माहितिप्रमाणे फक्त ४ इमारती अधिकृत आहेत. खाडीत भराव टाकल्यामुळे तेथे असणाऱ्या तिवरांची बेसुमार कत्तल झाली आहे. ह्या तिवरांच्या आधारावर जगणारे जे जीव होते त्यांची कत्तलतर कुणाच्या खिजगणतीतही नसेल! ह्या इमारती बांधण्यासाठी लागणारी वाळूदेखील ह्याच खाडीतुन अनधिकृतरित्या काढली जात आहे. त्यामुळे देखील ह्या खाडीतील जैववैविध्याचा नाश होत आहे.

पण ह्या नजिकच्या फायद्यासाठी आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत, हे दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाहीये. ह्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक जीवाचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. हे आपण लहान असताना शाळेत शिकलोय पण आता विसरलोय किंवा सोयिस्करपणे विसरत आहोत. ह्या जैवसाखळीतला एक जरी दुवा निसटला तरी ही साखळी पुर्णपणे तुटणार आहे. आणि ही साखळी टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा म्हणुन हे वर्ष UENP (United Nations Environment Program)ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे.

आपणांकडे वेळ फार थोडा आहे. जे काही करायचे आहे ते लवकर करायचे आहे. नाहितर आपलेच भविष्य फार अंध:कारमय आहे.

सौजन्य : http://www.unep.org/wed/2010/english/theme.asp

बेबी स्टेप्स...

2 टिप्पणी(ण्या)
नमस्कार,

ब्लॉगच्या विश्वात हे माझे पाहिले पाउल! माझा पहिला ब्लॉग...
नमस्कार,

ब्लॉगच्या विश्वात हे माझे पाहिले पाउल! पण का लिहितोय मी हा ब्लॉग? कारण कधीतरी उगाचच काहीही सुचतं म्हणून...
जे सुचेल, जे मला आवडले ते लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे! तुम्हाला पटलं, आवडलं, नाही पटलं, नाही आवडलं तरी मला कळवा... चुकलं तर शिकवा! इ अं जुस्त अ नेव्बी इन ठिस... म्हणजे I am just a newwbee to this!

धन्यवाद