Introduction

न्याय?

आज २६ वर्षांनंतर भोपाळ गॅस दुर्घटनेत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज निकाल दिला. आठ दोषींना २-२ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड आणि युनियन कार्बाईड या कंपनीला ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. मात्र ह्या कंपनीचा त्यावेळेचा अमेरिकन अध्यक्ष वॉरेन अ‍ॅंडरसन हा अजुन फरारी आहे. त्यामुळे खरचं भोपाळवासीयांना न्याय मिळाला आहे का?

मुळातच न्याय द्यायला २६ वर्षे कशी लागु शकतात? सुमारे २५००० जणांचा जीव घेणाऱ्या ह्या घटनेचे सरकार, न्यायालये आणि समाज ह्यांना खरेच काही गांभिर्य आहे की नाही? आजही ह्या वायुगळतीचे दुष्परिणाम भोपाळ आणि आजुबाजुच्या परिसरात जाणवत आहेत. आज पाव शतकानंतरही तेथील नागरिकांना श्‍वसनाचा, डोळ्याचा व स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो आहे. ह्या सगळ्याला जबाबदार कोण?

ह्या कंपनीची मुळ कंपनी असणाऱ्या UCC (Union Carbide Corporation) ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन कंपनीच्या देखभालीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. तरीसुद्धा त्याची दखल घेण्यात आली नव्हती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धोकेदायक रसायने, वायु हाताळण्याबाबतचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. एवढेच नव्हे तर वायुगळती सुरु झाल्यावर त्यावर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी किंवा त्या वायुगळतीविरुद्ध काय उपाय करण्यात यावेत हे प्रशासनाला सांगायलादेखील कंपनीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता.

ह्यावरुनच ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची कायदा खिशात घालण्याची मनोवृत्ती दिसुन येते. न्यायसंस्थेने उपलब्ध कायद्यांच्या आधारे हा निकाल दिला. पण ह्या मिळणाऱ्या १३ लाख रुपयांनी वायुग्रस्तांना भरपाई कशाप्रकारे देण्यात यावी हे देखील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले असते म्हणजे बरे झाले असते! आतापर्यंतच्या सर्व केंद्र सरकारांनी किती वेळा अ‍ॅंडरसनच्या हस्तांतरणासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे? एकदाही नाही!!! हे लोकांचे सरकार, त्यांच्या लोकांच्याच बाबतीत एवढे उदासिन कसे राहु शकते? एकाही केंद्रिय किंवा राज्य मंत्र्याचे आजच्या न्यायदानावर कुठल्याही प्रकारचे भाष्य आलेले नाही! जो तो आपल्यामध्येच मग्न! सामान्य मरतोय ना, मग मरुदेना तिच्या आयला! आम्ही आमच्या सरकारचे १०० दिवस, १ वर्ष साजरे करण्यातच धन्यता मानणार! वरती ह्याच डाऊ कंपनीला योग्य भरपाई घेतल्याशिवाय आणखी प्ल्यॅंट्स बांधायला परवानग्या देणार!

ह्या दुर्घटनेत ’जस्टिस’ नुसताच ’डिले’ झालेला नाही तर तो ’डिनाईड’ झालेला आहे! भोपाळ वायुग्रस्तांची लढाई अजुन संपलेली नाही. ती वॉरेन अ‍ॅंडरसनला शिक्षा होईपर्यंत चालुच राहणार आहे. तोपर्यंत करुयाच आपण सगळे ह्या ’जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनेचा’ महोत्सव साजरा दरवर्षी!!!

ता.क.: हा वॉरेन अ‍ॅंडरसन म्हणे आपल्या देशातल्या एका फार मोठ्या राजकिय घराण्याच्या अतिशय जवळकीतला आहे!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा