Introduction

विधानपरिषदेचा घोडाबाजार

विधानपरिषदेचा घोडाबाजार, आपलं निवडणुक संपली पण त्याचं कवित्व काही संपायचं नाव घेत नाहिये. आजच्या सामनात राज ठाकरे ह्यांना ’धनाजीराव’ हे नाव देण्यात आले आहे. (शिवसेनाप्रमुख त्यांच्या विरोधकांना नावं बाकी मस्त ठेवतात. लखोबा काय नि नारोबा काय! साहेबांचे हे एक आपल्याला जाम आवडतं!). हां तर, सांगायचा मुद्दा हा की, मनसेने "पैशांच्या थैल्या" घेऊन कॉंग्रेसचे आमदार निवडुन दिले, असं सामनाच्या संपादकांचे म्हणणे आहे.

आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकींच्या वेळी प्रचंड आर्थिक ’देवाणघेवाण’ होते, हे एकप्रकारे आपण सगळ्यांनी मान्य केले आहे असा एकंदरीत सर्व माध्यमे, जनता ह्यांचा सुर दिसुन येतोय! हा लोकशाहीला अत्यंत घातक असा पायंडा पडत चालला आहे. माध्यमांना ह्या घोडे बाजारावरील ’न्युज’शी काहीही देणं घेणं नाही, त्यांना ’उध्दव-राज’ ह्या जंगी सामन्यात खरा इंटरेस्ट आहे. म्हणुन तर एकाही बातमीत किंवा लोकल गाड्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या, ’राज साहेब योग्य बोलले किंवा उध्दव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे ह्यांना मस्त शालजोडीतली दिली’ ह्या विषयांच्याच! एकाही चर्चेचा विषय ह्या निवडणुंकामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना विरोध हा दिसुन येत नाही! लोकांना खरचं ह्या विधान परिषदेच्या निवडणुकांत काही इंटरेस्ट असावा का? ह्याचं उत्तर नाही असच द्यावं लागेल!

ह्या विधान परिषदेची मुळातच काही गरज उरली आहे का? काही राज्यांत अशा प्रकारचे ’अपर’ सभागृह अस्तित्त्वातच नाही आहे! आणि तशीही ह्या सभागृहाची गरज ही फक्त काही ’गरजवंतांची’ सोय म्हणुनच उरलेली दिसुन येतेय! सरळ निवडणुकीत हरलो तरीही मंत्री बनायचय? काही काळजी नाही, पक्ष विधान परिषदेत देईलच निवडुन! पुतण्याची ’करियर’ बनवायची आहे? आहे, विधान परिषद आहे! काही गंभीर आरोपांमुळे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला? नो प्रॉब्लेम, आरोपांचा धुरळा खाली बसेस्तोवर विधान परिषदेच्या निवडणुका लागतच आहेत! हे सभागृह हे समाजातील कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक ह्यांना कायदेमंडळात स्थान मिळाव म्हणुन आहे! पण विधानपरिषदेत ह्या क्षणाला किती कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक आमदार आहेत? अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याइतके!

कुठेतरी वाचलं होतं, समाजाला त्याच्या लायकीचाच पालनकर्ता भेटत असतो. रामराज्यातील प्रजा चांगली होती म्हणुनच त्यांना ’रामा’सारखा राजा मिळाला! आज आपल्या सरकारतील बरेच मंत्री कुठ्ल्याना कुठल्या वादात अडकल्याचं दिसुन येते. आपल्या गृहराज्यमंत्री तर एकापेक्षा एक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे चित्र आहे! हे सगळं होते कारण आपला निवडणुकीच्या बाबतीतला प्रचंड अनुत्साह! आपण जर योग्य उमेदवारांची निवड केली तर हा घोडे बाजार काही अंशी तरी टाळता येऊ शकतो. त्यासाठी आपणचं प्रयत्न करायला हवेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा