काल ५ जुन, जागतिक पर्यावरण दिन.
दरवर्षी युनायटेड नेशन्स एक विषय घेऊन हा दिवस साजरा करित असते. ह्या वर्षीचा विषय होता, ’अनेक प्रजाती, एक ग्रह, एक भविष्य’... हे वर्ष ’युनायटेड नेशन्स’ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे. ह्या आपल्या ग्रहावर अंदाजे ५ ते १०० दशलक्ष वेगवेगळ्या प्रकारचे जीव नांदत आहेत. पण त्यापैकी मानवाला फक्त २ दशलक्ष जीवांची ओळख पटलेली आहे. म्हणजे अजुनही असे अनोळखी जीव ह्या पृथ्वीतलावर आहेत.
ह्या असंख्य जीवांमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे कि ज्याची लोकसंख्या अमर्याद वेगाने वाढत आहे. त्याच्या गरजा वाढत आहेत. त्याची भुक वाढत आहे. आणि ह्याचमुळे त्याने इतरांच्या हक्कांवर हल्ला केला आहे. त्यामुळे बरेच जीव ह्या जीवनाच्या शर्यतीतुन बाहेर पडत चालले आहेत. असे बरेच जीव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
सुमारे १२००० जीव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ह्यात फक्त मानवास ज्ञात असणाऱ्या जीवांचाच समावेश आहे. कित्येक जीवतर आपणांस त्यांची ओळख होण्याच्या अगोदरच नामशेष होत आहेत.
ह्याला कारण एकच... मानवाच्या अमर्याद वाढीचा अमर्याद वेग. मानवाने सरळ सरळ ह्या जीवांच्या हक्काच्या परिसर परिघात अतिक्रमण केले आहे. साधं उदाहरण म्हणजे ’दिवा’ गाव. हे गाव, म्हणजे आता ह्याला गाव का म्हणायाचं हा मोठा प्रश्न आहे एवढी ह्या गावाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. हां तर काय सांगत होतो तर ह्या दिवा गावात खाडीवर भराव टाकुन इमारती बांधल्या आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्वच्या सर्व इमारती अनधिकृत आहेत. ह्या गावात माझ्या माहितिप्रमाणे फक्त ४ इमारती अधिकृत आहेत. खाडीत भराव टाकल्यामुळे तेथे असणाऱ्या तिवरांची बेसुमार कत्तल झाली आहे. ह्या तिवरांच्या आधारावर जगणारे जे जीव होते त्यांची कत्तलतर कुणाच्या खिजगणतीतही नसेल! ह्या इमारती बांधण्यासाठी लागणारी वाळूदेखील ह्याच खाडीतुन अनधिकृतरित्या काढली जात आहे. त्यामुळे देखील ह्या खाडीतील जैववैविध्याचा नाश होत आहे.
पण ह्या नजिकच्या फायद्यासाठी आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत, हे दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाहीये. ह्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक जीवाचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. हे आपण लहान असताना शाळेत शिकलोय पण आता विसरलोय किंवा सोयिस्करपणे विसरत आहोत. ह्या जैवसाखळीतला एक जरी दुवा निसटला तरी ही साखळी पुर्णपणे तुटणार आहे. आणि ही साखळी टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा म्हणुन हे वर्ष UENP (United Nations Environment Program)ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे.
आपणांकडे वेळ फार थोडा आहे. जे काही करायचे आहे ते लवकर करायचे आहे. नाहितर आपलेच भविष्य फार अंध:कारमय आहे.
सौजन्य : http://www.unep.org/wed/2010/english/theme.asp
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा